अहमदनगर तालुक्यात कुस्ती आखाड्यात हाणामारी ,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
अहमदनगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी येथील बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या कुस्ती आखाड्यात मंगळवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 12 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्री. रावसाहेब ज्ञानदेव जाधव (वय 53 रा. देऊळगाव सिध्दी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत विठ्ठल घायमुक्ते, खंडू विनायक घायमुक्ते, राजेंद्र दिनकर घायमुक्ते, बाजीराव दिनकर घायमुक्ते, बंटी राजेंद्र घायमुक्ते, दीपक मुरलीधर घायमुक्ते, सागर विलास घायमुक्ते (सर्व रा. देऊळगाव सिध्दी) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्री. रावसाहेब जाधव यांचा मुलगा व भरत घायमुक्ते यांच्यात सुरूवातीला गावातील मारूती मंदिरासमोर शाब्दीक वाद व मारहाणीची घटना घडली होती. यावरून कुस्त्यांच्या आखाड्यात येवून भरत घायमुक्ते याने रावसाहेब यांना दगड फेकून मारला. इतरांनी रावसाहेब व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली. मुलाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली आणि दोन लाख 20 हजार रूपये गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.
दुसर्या गटाचे बाजीराव दिनकर घायमुक्ते (वय 43 रा. देऊळगाव सिध्दी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव रावसाहेब जाधव, अप्पा गंगाराम गिरवले, रावसाहेब मारूती कराळे, नवनाथ भाऊसाहेब देवीकर, सागर अशोक कराळे (सर्व रा. देऊळगाव सिध्दी) यांच्याविरूध्द मारहाण, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार बाजीराव घायमुक्ते हे वैभव जाधव याला म्हणाले की, कृष्णा घायमुक्ते याला पंच म्हणून घ्या. असे म्हणताच त्याचा राग आल्याने वैभवने फिर्यादीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ देखील केली होती. तसेच इतरांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक नगर ग्रामीण विभाग अनिल कातकाडे करीत आहेत....Read more
Comments
Post a Comment